|| सांध्यकळस ||

तुच लिहुन द्यायचीस

तुझ्यासकट

या प्रहर-कथा….

ढगांच्या तळहातावर

एखादा ओघळ अडवुन

‘आभाळ’ थांबवायचीस…

अन..

तो कलंडता जन्म

अस्ताच्या लक्ष वेळा

जगुन घ्यायचा…

तेव्हा …शांत असायचा (अजुन आहेच…)

स्मरणांच्या

लख्ख प्रदेशातला

अखेर मत्रं गाभारा…

आत भरला वारा..

आत्मलीन…

“सांध्यकळस”

अन, संध्यामग्न दिवस…

अगदी कथेच्या

तु माझ्यासकट

सुचवलेल्या (न ठरलेल्या)

…शेवटापर्यंत…….

-एस. के.

 

[मला कधी हे सुचलंच नाही...कदाचीत कोसळलो असतो दोघेही]

__ती अन पाउस__

ती होती तेव्हा

पाउस असायच्या..

तीच्या दोन ओठांवर

ओलसर हसायचा…

 

तिच्या आधी पाउस

भर दुपार कट्ट्यावर..

कपाळी रुमाल पट्ट्यावर..

चिखलभर खेळायचा

दोस्तांमागे पळायचा

 

तिच्या सोबत पाउस

लख-लखणा-या लाख वीजा..

इवले अंतर अन नंतर

अंतरातुनी भय वजा…

 

ती नसताना पाउस

पानांवर साचतो..

जुनी कविता वाचतो..

समोर खिडकी काचेवरुन

थेंब थेंब ओघळतो..

 

ती नाही तर ….

नुसतंच पाणी..

लोकलच्या दारावर

ऑफ़िसच्या काचांवर

ओघळत रहातं..

वाहत जातं…

.

.

कुठुन येत..?

.

.

कुठे जातं?

…..

-एस. के. [तिचा पाउस...तिच्या कविता]

___निळ्या फ़ुलांची रात___

तु एकट संध्यासमयी
या पाण्यावरली ओळ
सांग कशाने लिहिले
तु थेंबांवर आभाळ ?

हे लखलखती नव्याने
भगव्या देहाने विश्व
सुनसान ह्र्दयतीरावर
धावती कशाला अश्व

शांत सावल्यांभवती
तुझी उदासीन माया
तु थरथरते आलिंगन
अंधार पुर्ण सजवाया

उजळुन निघायासाठी
तोही घरभर फ़िरला
अन दिवेलागणीसाठी
तु निरांजनावर धरला

जीव जळाला म्हणुनी
डोळ्यात क्षणभर ओल
करुणेची साधुन वेळ
अंगणात पडावे फ़ुल

सुन्न जरासा दर्वळ
वा-यावर फ़िरत रहातो
तु शब्द तयाला देता
तो आभाळाला जातो

कवितेचा हट्ट्च होता
“निळ्या फ़ुलांची रात”
अशात ओंजळ ठरतो
तुझाच लिहिता हात

—एस. के. [ निळ्या फ़ुलांची रात ]

_____सांजखुणा_____

सांजखुणांना गहिवर राधे विश्व जळाले त्यात
हळुच कोरडी हुरहुर तु गं सोडुनी दे पाण्यात…!!

कृष्ण पिउनी हलते झुलते यमुनेवर द्वारका
अमृतमय दुख:त बुडाला कलश मनासारखा…!!

पोरकी तीरावर बासरीतला सुर हरवली गुरे
निळी- सावळी धुळ उमटता बावरती वासरे…!!

बावर – बावर अंतरातुन नाद निळावत गेला
उर पेटल्या अंधाराचा असाच पांघर ओला…!!

उभ्या पुरातन ओलाव्याच्या सांजखुणा गं राधे
स्मरणयुंगांत जगले-उरले प्रेम नसे गं साधे…!!

-एस. के. [ तुझी ही संध्याकाळ , तुझे आभाळ]

____वारा____

_


तुझ्या अस्तकाल कथेच्या
पानांनी घर भरुन गेले आहे…
अंधारभरल्या खिडकितुन
वाहणा-या वा-यावर,
अखेरदर्शी स्मरणांच्या धुळीचे टिंब,
त्याआधीच्या काहि ओळी…
..खोडुन चुकलेले…तर
काही चुकुन खोडलेले संदर्भ
तेव्हाचे… कपाच्या तळाशी
गोठलेले कॉफ़ीचे थेंब
तुझा घट्ट मिठिचा पाउस
नंतरच..निळसर डोळ्यांच आभाळ
हे लिहिताना..संपलेली शाई
भरभर सरल्या दिवसांच कॅलेंडर
त्या भान विसरल्या क्षणांची थरथर
अन….,
काहि अर्धवट आकृत्या
उडत आहेत वा-यावर…
घर भरुन गेलंय वा-याने
तेवढा…पदर सावर
घर वाहुन जाईल वा-याने
हा वारा थांबव..

..
.
कथा संपेल…

—एस.के [अस्तकालच्या कथा]

वेड

तु बहर ठेऊनी गेलीस
दिक्काल धुकाच्या वेळी..
अन उन साचले तेव्हा
ओघळल्या याही ओळी…!!!

कितिक सजल्या हाका
वेशीवर राघव गहिरा….
सुटल्या धुळीचा ओला
तुटतो मैथीली गजरा?

उघडेच ठेउनी दार
हे इथवर आले अंगण…
तु सारवलेली ओंजळ..
तिच्यात फ़ुलांचे पैंजण…!!

तंद्रित आरसा अजुनी
असेल पाहत तुजला
मळवट भरल्या केसांनी
असेल जरासा भिजला….!!!

भिजल्या पदराचा वारा
हा अजुन फ़िरतो आहे
तु ’वेड’च होतीस माझे
म्हणुनच घडते का हे ?

मग घेवुन केशरी साज
तु ये्शील संध्याकाळी…
सावळ्या मिठीतच पुन्हा
गोठतील नव्याने ओळी…!!!!

—-एस. के .[ तु म्हणजे वेड..फ़क्त फ़क्त......वेड]

_____अबोल______

तु अबोल,मी अबोल,अबोल गीत आपले
तु केसातुन माळलेस, श्वासही फ़ुलातले

अनाम तु,अनाम मी, अनाम हाक येतसे
अशांत पैजणी मनास लागते अटळ पिसे

दुर तुझ्या माझ्याही, हलणा-या सावल्या
ओलकळ्या डोळ्यांशी फ़ुलणा-या ओवल्या

मी तुझ्यात तुटताना हा नभरंग सावळा
तुझ्या उरात तुटलेला सुर शोधतो गळा

तु अलगदही ठेवशील पाण्यावर चांदणे
त्यांनाही चालते का असे अमिट गोंदणे ?

कलंडत्या दिशेवरी, हे मेघ रेखती तुला
कुणी नभास लावला अबोल रंग आपुला ?


–एस. के. [ तु उदास मी उसास, उदास सांज मावळे]

___संभ्रम____

तुझं उगवतानाचं
केशर अंग
जुने तरंग
लयीत कलत्या
तीरावरचा
तो भव्य प्रहर
हलकेच तमांत शिरल्यावर
तुझी हाक ऐकु येते
सजलमेघ वाटांवर
अचल अमित लाटांवर

त्यानं उतरणीला लागलेला
क्षितिजदीप
वितळतो…

प्रतिबिंबीत पर्वत
अंत:करणाच्या पायथ्याशी
संभ्रमी थेंब होतो

तेव्हा अन तिथेच
मी मावळतो
माझ्यातल्या
आंधळ्या सुर्यासकट….!!

–एस. के. [ ती आली ती वेळ ]

तु ये अशी केंव्हातरी

तु ये अशी केंव्हातरी.
ओठावरी गाण्यापरी…!!!
डॊळ्यातल्या पाण्यावरी
तु ये अशी केंव्हातरी…!!!

माझ्याहुनी
माझ्यात खोल…
नजर तु ,
तुझ्यात ओल….
ढळु नकोस
जाईल तोल…
ओघळ असा गालावरी
तु ये अशी केंव्हातरी…!!!!

कोवळ्या फ़ुलावरी
तुझा सुवास…
खुळ्या मनास
तुझाच भास..
तुझाच गंध
श्वास-श्वास….
ही जशी जादुगरी
तु ये अशी केंव्हातरी…!!!!

ओठावरी गाण्यापरी…!!!
डॊळ्यातल्या पाण्यावरी
तु ये अशी केंव्हातरी…!!!

–एस. के [ तुझेच गीत तुझ्यावरी]

____एक गाणं_____

तु हसलीस तेव्हा
त्या ओठांवर
मी नजरेसकट
जन्म…
श्वास…
जीव …
रोखुन

सगळंच गेलं

अगदी क्षणभर
वा-याने गाणंभरुन
फ़ुलांची ओंजळं
अंगावर फ़ेकावी तसचं…
अगदी तसंलच
एक गाणं झालं !!

हसण्याचं…..

मग नसण्याचं !!

नंतर असण्यांच … !!
आणि दिसण्यांच ..

माहित असुनही
मग तुझं उगाचचं
“छे !! तुझं आपलं काहितरीच !”

पुन्हा हसणं
सगळं जाणं
पुन्हा गाणं
एक हसण्याचं
नंतर…..

….
…..

—एस. के. [पुढंच तुला माहितीये .....]

« Older entries

Follow

Get every new post delivered to your Inbox.