एप्रिल 29, 2008 at 8:03 सकाळी (कविता)
शब्द जहर, कधी शब्द कहर
कधी भावरंगी संथ लहर
लहरीतुनी स्वप्नरक्त वाहते
मन शब्दातुनी बोलु पाहते….
शब्द आस, कधी शब्द भास
कधी हृदयी घुटमळता एक श्वास
श्वासातुनी नाव ’ते’ घुमु लागते
मन शब्दातुनी बोलु पाहते….
कधी शब्द रंग, कधी अंतरंग
कधी नकळत थरथर अन, तरंग
तरी नजर पुरावा अजुन मागते
मन शब्दातुनी बोलु पाहते….
शब्द धुके, ते शब्दही मुके
कधी ही सोनेरी तनु झुके
राज पुसटसे खोलु पाहते
मन शब्दातुनी बोलु पाहते….
शब्द गंध ही शब्द धुंद
पावले नशेची मंदमंद
नसांनसातुनी ’तीच’ वाहते
मन शब्दातुनी बोलु पाहते….
शब्द मेघ ’ती’ चांदणरेघ
सावल्या कापती शब्दभेग
चांदण्यासवे ती झरु पाहते
मन शब्दातुनी बोलु पाहते….
हा शब्द शब्द हा शब्द्स्पर्श
शब्दासवेही मी वाटतो हर्ष
जगणे मज शिकवुन जाते
मन शब्दातुनी बोलु पाहते….
–सचिन काकडे [ एप्रिल २९,२००८]
फ़क्त तुझ्यासाठीच ” हा खेळ सावल्यांचा”
© सचिन काकडे
प्रतिक्रिया नोंदवा
एप्रिल 26, 2008 at 7:57 सकाळी (कविता)
असलो जरी चांद नभीचा
चांदतो मी पाण्यातही
हाती धरुनी पांगळ्या सुराचा
रांगतो मी गाण्यातही
पाडती सारे भाव खोटॅ
वेड्या मनाच्या टाकसाळी
शब्द होऊनी असा चमकतो
कधी मी ख-या नाण्यातही
मी असण्याला अर्थ नाही
नसनेही माझे व्यर्थ राही
मागे फिरता सवाल ठरतो
का राज दडती जाण्यातही?
का तोलीशी अजुन स्वतःला?
श्वास थेबांतुनी पाउल झाला
अन, तु उगा का थांबतो?
आहे तीच नशा वहाण्यातही
मज चांदणेही अफाट मिळते
तेही असेच मेघ गिळते
तरी अजुनी नशेत असता
चांदतो मी पाण्यातही….
-सचिन काकडे [ एप्रिल २५,२००८]
फ़क्त तुझ्यासाठीच ” हा खेळ सावल्यांचा”
© सचिन काकडे
प्रतिक्रिया नोंदवा
एप्रिल 17, 2008 at 6:20 सकाळी (कविता)
श्रावणवेड्या गोकुळात या
घुमु लागला पावा हरीचा
सुर मिसळला हळवा, मंजुळ
अस्मानाच्या संथ सरीचा
कोसळते जसे स्वर नभातुन
थेंब येती तसेच सरसर
ओलसर काळ्या मेघाना त्या
साद देतो जणू हा मुरलीधर
गंध दाटला, रंग गोठला
तृष्णा ही आली स्वरात
स्पर्श जाहला, हर्ष वाहीला
आज राधाही होती भरात
उसळते झाले सुर कोवळे,
अन, यमुनेलाही पान्हा फ़ुटला?
उमगेना तव राधेलाही
गुंजनात या कान्हा कूठला?
हा हरीच स्वर अन, हरीच सुर
हरीच सर अन, हरीच पुर
हरीगीताचे हे मृगजळ सारे
हे रान सावळे, सावळेच वारे
-सचिन काकडे [ एप्रिल १७,२००८]
फ़क्त तुझ्यासाठीच ” हा खेळ सावल्यांचा”
© सचिन काकडे
प्रतिक्रिया नोंदवा
एप्रिल 11, 2008 at 7:22 सकाळी (कविता)
अश्याच कधीश्या सांजवेळी
कुठुन अलगद वारा येतो….
जुन्या घराच्या उंबरठ्यावर
मोरपिस एखादं सोडुन जातो…
मनास तेजाळणारे ते
निळसर हिरवे गर्द रंग
जणू प्रतीबिंबच आहे
तुझ्या-माझ्या नात्याच्या अस्तित्वाचं
प्रतीबिंब असं….जे..
सोबतीला कधी आठवणी..
तर कधी मागे फक्त भास…..ठेवुन जातं…
-सचिन काकडे
प्रतिक्रिया नोंदवा
एप्रिल 1, 2008 at 1:10 pm (कविता)
आठवतं त्या क्षीतिजावरती?
फ़ुले सावळी उमलत होती..
अन, डोळे तु अलगद मिटता
किरणकळी तुज बिलगत होती..
बंद डोळ्याआड तुझिया
गंध कोवळा बरसत होता..
जणु दिशांच्या कायेवरुनी
रंग सोहळा उतरत होता..
आठवते का ते नभ निळे
रुप तुझ्यास्तव बदलणारे..
इंद्रधनुचे ते दिव्य पिसारे
अन, वक्ष पश्चिमी सजणारे..
तुझ्यासवे मी झेलत होतो
बहरणारा तो ओला उत्सव..
अंतरातली लय तव पुसता
मोहरणारा क्षण तो आठव..
घट्ट मुठीतुनी गतक्षणांच्या
आज ओघळती सये अंतरंग..
मनातल्या हळव्या तळ्यातही
का पाण्याविनाच उठती तरंग?..
आता सावळा रंग बरसता
सये थेबांतुनही येते थरथर..
तुझ्याविना मी जाळत जातो
क्षण हे ओले कातर कातर.
मज सलते खुण स्वप्नांवरची
जणु जखमा सत्य, जखमाच वास्तव..
तुझ्याविना त्या क्षीतीजावरला
विस्तव भासे मज तोच उत्सव..
-सचिन काकडे [एप्रिल १,२००८]
फ़क्त तुझ्यासाठीच ” हा खेळ सावल्यांचा”
© सचिन काकडे
प्रतिक्रिया नोंदवा