जून 26, 2008 at 10:13 सकाळी (कविता)
बहरला रातरंग
रंगानेच भास दिला
गर्द रान धडपडती
हसु आले पाकळीला
रास करी कान्हा
अन राधाही संगतीला
यमुनेतुनी स्वर येती
सुर फ़ुटे बासरीला
छन-छनननन वाजे वारा
पान झुले सोबतीला
चांद मग्न तरी सुरु
पुनवेच्या रातलीला
रात चढे, स्वप्न पडे
झोपलेल्या चांदणीला
लाजली ती ह्सली अन
उगा मिटे पापणीला
कशी रातही भरात आली
शोधे कुण्या सावलीला?
कळवळते, आळवते
हाक देते चाहुलीला?
साज खुले, गंध फ़ुले
ओठांनी स्पर्श दिला
श्वास तप्त जाळती
शब्दांच्या साखळीला
–सचिन काकडे [ जुन २६,२००८]
फ़क्त तुझ्यासाठीच ” हा खेळ सावल्यांचा”
© सचिन काकडे
१ प्रतिक्रिया
जून 25, 2008 at 1:28 pm (कविता)
मन पावसात चिंब न्हाले..
मन गारव्यात धुंद झाले..
पावसात, गारव्यात मन
आठवात गुंग झाले…….
ही सरसरती सर ओली..
आभाळाला तुच दिली..
ती झेलताना, पेलताना
उरातुनी वीज गेली..
लख्खलख्ख चमकुनी मन
ओंजळीत बंद झाले….
मन पावसात चिंब न्हाले..
हा दरवळता ऋतु गार..
वा-यावरी नशा स्वार..
सळसळता अन छळता
फ़ुलांवरी झाला वार ..
श्वास दग्ध घेऊनी मन
पाकळीत गंध झाले…
मन पावसात चिंब न्हाले..
सये अंगणात सुर येई..
तो वा-यासवे दुर जाई..
गुणगुणतो, ऋणझुणतो
हिरवा रानी पुर वाही..
पानावरी झरुनी मन
थरथरता थेंब झाले….
मन पावसात चिंब न्हाले..
मन गारव्यात धुंद झाले…
–सचिन काकडे [ जुन २५,२००८]
फ़क्त तुझ्यासाठीच ” हा खेळ सावल्यांचा”
© सचिन काकडे
2 प्रतिक्रिया
जून 18, 2008 at 11:07 सकाळी (कविता)
“कधी ओंजळीत, मी कधी पानांवरती
कधी संथ मी, कधी मी लाटांवरती
कधी डॉळ्यांतुनी मी कधी श्वासातुनी
झरतो, ओघळतो मी गालांवरती”
मी प्रश्न मी मीच उत्तर…………….
कधी माझ्यासाठी मीच प्रश्न,
कधी माझ्यासाठी मीच उत्तर
कधी मी प्रश्न, कधी मी उत्तर
किती प्रश्न मी कितीसा उत्तर?
कधी चुकवले होते मीच मला,
कधी शिकविले होते मीच मला
कधी प्रश्नासाठी, त्या प्रश्नापोटी
कधी बदलले होते मीच मला
कधी मी माझ्यातच सापडलो,
कधी मी माझ्यातच अवघडलो
कधी उत्तरात इथे मी बडबडलो,
कधी मी प्रश्नाआधीच गडबडलो
कधी देतो मी, कधी मागतो
कधी विचारतो, कधी सांगंतो
कधी शोधतो मी कधी लपवतो
कधी मी सुत्रांसकटच हरवतो
कधी उगाच मी इथे थांबतो
ओळी-ओळीत इथे मी लांबतो
पान मागचे मी उलटुन घेतो
अन, तिथं स्वतःलाच मी पाहतो
चुकतो कधी मी कधी बरोबर
कधी खोटं-खोटं कधी खरोखर
लेखणीतुनी मी खोल मनाच्या
कधी थेंब-थेंब कधी येतो झरझर
मी माझे अक्षर मी सुत्र माझे
मी शब्द माझा हे मित्र माझे
आरंभ मीच मी अंत माझा
इथं प्रयोग मी, मीच पात्र माझे
–सचिन काकडे [ जुन १७,२००८]
फ़क्त तुझ्यासाठीच ” हा खेळ सावल्यांचा”
© सचिन काकडे
प्रतिक्रिया नोंदवा