सप्टेंबर 23, 2008 at 2:59 pm (कविता)
कधी सांग होईल….
कधी सांग होईल….
तुजला पहाणे?
कसे सांग शोधावे…..
तुजला मनाने ?
गुज ही उन्हाची,
कशाला हवेशी?
जणु राहिले,
स्वप्न ते दुरदेशी..
तुझा तोच श्वास,
श्वास अलवार भास..
तप्त भासातुनी गं,
छेडते ही आस..
तरी आसवेडे..
मन माझे दिवाणे..
पुरे गं.. पुरेना….
तुझे हे बहाणे..
कधी सांग होईल..
तुजला पहाणे?
कसे सांग शोधावे…
तुजला मनाने ?
कशी बोलकी,
पावले सावलींची..
जणु खुण दावी,
तुझ्या चाहुलींची..
भगव्या उन्हाचा..
दुर जातो किनारा..
तसा ऐकु येतो,
नभाचा ईशारा..
ईशा-यास जमते,
तुझे गीत गाणे…
तुजला पहाया,
स्वरही झाले दिवाणे
कसे सांग शोधावे….
तुजला मनाने ?
कधी सांग होईल….
तुजला पहाणे?
–सचिन काकडे [ सप्टेंबर २३,२००८]
फ़क्त तुझ्यासाठीच ” हा खेळ सावल्यांचा”
© सचिन काकडे
प्रतिक्रिया नोंदवा
सप्टेंबर 22, 2008 at 5:59 pm (कविता)
नभी चांदण्यांच्यासवे, रात जागते आभाळ…
शाल ओलेत्या धुक्याची, रोज मागते सकाळ…
मेघ करीती ओंजळ, भास ओला विणायाला…
धागा खरा अंधाराचा, वारा फक्त म्हणायाला…
थेंब थेंब विणताना, नशा उगा देते हुल…
नजरेस त्याच जुन्या…आठवांची पुन्हा भुल…
भुलताना होतो डाव, अंधारतो सारा गाव…
अंधाराच्या मागोमाग, शब्द ओले,ओले नाव
उरी नाव जपताना, सुचु लागते ही माळ…
नभी चांदण्यांच्यासवे, रात जागते आभाळ..
अशी पहाटेच्या अंगी, नभ पांघरतो शाल…
सुरवेड्या सावल्यांची, जागी ठेवतो मशाल…
खरा शोभुन दिसतो, तो हार तिच्या गळा…
दाट शालीस लागतो, तव किरणांचा लळा..
ती गात जाते वा-यावरी, रान सैरभैर होते..
पानातुनी सळसळ, गुज मनभर होते…..
असे नादावते मन, मन फिरे रानोमाळ…
नभी चांदण्यांच्यासवे, रात जागते आभाळ…
–सचिन काकडे [ सप्टेंबर २२,२००८]
फ़क्त तुझ्यासाठीच ” हा खेळ सावल्यांचा”
© सचिन काकडे
प्रतिक्रिया नोंदवा
सप्टेंबर 12, 2008 at 4:49 pm (कविता)
तिच्या चाहुलीचे सुर
मघा तळ्यावरी आले…
पाण्यासवे ओले स्वर
कसे खुळ्यापरी झाले…?
वारा खूणावुनी गेला…
उगा अंधार केला…
चाळीती नजर सावल्या
वार हळुवार केला…
डोळे मिटुनी निघालो..
पाखरे सोबतीला आली..
गीत सुचले पंखांना..
वाट नादावली, निघाली..
स्वर ओठावर होते..
सारे तिच्याच उन्हाचे..
काही आठवित होतो..
काही गायलो मनाचे..
उभी सांज उंब-याशी..
मीही दारावर आलो..
तिची प्रीत अंगणाशी..
नभा सांगतो म्हणलो..
उगा बावरणे झाले..
मग सारवणेही झाले..
गाली लाजता लाजता..
उगा रागवणेही आले..
ती हसत म्हणाली..
“सांगतोस….मग
सांग ‘गीत’ प्रेमाचे त्या नाव
भेट प्रीतीची म्हणोनी
रोज देईन चांदण्यांचा गाव
–सचिन काकडे [ सप्टेंबर ११,२००८]
फ़क्त तुझ्यासाठीच ” हा खेळ सावल्यांचा”
© सचिन काकडे
१ प्रतिक्रिया
सप्टेंबर 12, 2008 at 4:47 pm (कविता)
रात्रीच आभाळ फाटलयं
जरा भिजेन म्हणतो…
कर्ज सा-या ढगांच
आजच फेडीन म्हणतो…
त्या विजेचाही मजवरी
आता आरोप नसावा
आज जरा तिलाही
कवेत घेईन म्हणतो..
नको कथा सांगाया?
त्या ओल्या अंगणाची
वळचणीलाच का होईना पण…
जरा अलवार वाहीन म्हणतो
आज तीही वळतेच आहे…
दिशा सांगती सा-या
स्वप्नं पाठमोरी तरी
जरा तिला पाहिन म्हणतो
“चल जाऊ माघारी वेड्या
साद नव्हे आभास आठवांचा”
धरला हात ज्याने त्या
वा-यासवेच अता जाईन म्हणतो
ती म्हणते जाताना “रे सख्या
नको पुन्हा शिंपण शब्दांचे”
इवलेसेच आयुष्य थेंबाचे
जरा ओंजळीत लिहिन म्हणतो
–सचिन काकडे [ सप्टेंबर १०,२००८]
फ़क्त तुझ्यासाठीच ” हा खेळ सावल्यांचा”
© सचिन काकडे
प्रतिक्रिया नोंदवा
सप्टेंबर 12, 2008 at 4:44 pm (कविता)
माझ्यातल्या एका मित्राकडुन माझ्या एका मित्रास,
तु आला होतास तेव्हा काही
खास फरक पडला नव्हता
अजुनही…पडलेला नाही…….
मीच मुद्दाम त्या फरकाचा
त्या बदलाचा..,
कधी विचार केला नाही
आणि
कदाचीत करणारही नाही
एखाद्या नात्याची रेघ
माझ्या मनाजवळुन निघाली की
तिला त्याच दिशेने, त्याच रोखाने
अगदी ठरवुन, मला तोलत जाणं
कधी जमलच नाही..
आणि
कदाचीत जमणारही नाही………..
गुंतत जाणा-या त्या रेषानी
थरथरावं ,थरथताना शब्द व्हावं
शब्द होता-होता रंगांत भिजावं
पण, त्यांना थरथरताना, शब्द होताना
रंगाताना मी कधी पाहिलच नाही…
आणि
कदाचीत पहाणारही नाही…….
अश्या काही मोजक्याच रेषा
रंगुनही पुसतच गेल्या
माझ्या वर्तुळाच्या सुत्रांना
त्या रेषा गडद करणारी शाई मात्र
पुन्हा मला कधी मिळाली नाही..
आणि
कदाचीत मिळणारही नाही……
–सचिन काकडे [ ऑगस्ट २२,२००८]
फ़क्त तुझ्यासाठीच ” हा खेळ सावल्यांचा”
© सचिन काकडे
१ प्रतिक्रिया
सप्टेंबर 12, 2008 at 4:42 pm (कविता)
“आले होते….., सांग त्याला”
‘ती’ उंब-याला सांगुन गेली
पाहिले न मी तिला….
ती……मला पाहुनी गेली
—[ऑगस्ट १५,२००८]
प्रतिक्रिया नोंदवा