तु आला होतास तेव्हा काही
खास फरक पडला नव्हता
अजुनही…पडलेला नाही…….
मीच मुद्दाम त्या फरकाचा
त्या बदलाचा..,
कधी विचार केला नाही
आणि
कदाचीत करणारही नाही
एखाद्या नात्याची रेघ
माझ्या मनाजवळुन निघाली की
तिला त्याच दिशेने, त्याच रोखाने
अगदी ठरवुन, मला तोलत जाणं
कधी जमलच नाही..
आणि
कदाचीत जमणारही नाही………..
गुंतत जाणा-या त्या रेषानी
थरथरावं ,थरथताना शब्द व्हावं
शब्द होता-होता रंगांत भिजावं
पण, त्यांना थरथरताना, शब्द होताना
रंगाताना मी कधी पाहिलच नाही…
आणि
कदाचीत पहाणारही नाही…….
अश्या काही मोजक्याच रेषा
रंगुनही पुसतच गेल्या
माझ्या वर्तुळाच्या सुत्रांना
त्या रेषा गडद करणारी शाई मात्र
पुन्हा मला कधी मिळाली नाही..
आणि
कदाचीत मिळणारही नाही……
–सचिन काकडे [ ऑगस्ट २२,२००८]
फ़क्त तुझ्यासाठीच ” हा खेळ सावल्यांचा”
© सचिन काकडे

shrikrishnasamant म्हणाले,
सप्टेंबर 15, 2008 at 3:44 सकाळी
कविता आवडली.छान आहे