__भेट – “चांदण्यांचा गाव” __

तिच्या चाहुलीचे सुर
मघा तळ्यावरी आले…
पाण्यासवे ओले स्वर
कसे खुळ्यापरी झाले…?

वारा खूणावुनी गेला…
उगा अंधार केला…
चाळीती नजर सावल्या
वार हळुवार केला…

डोळे मिटुनी निघालो..
पाखरे सोबतीला आली..
गीत सुचले पंखांना..
वाट नादावली, निघाली..

स्वर ओठावर होते..
सारे तिच्याच उन्हाचे..
काही आठवित होतो..
काही गायलो मनाचे..

उभी सांज उंब-याशी..
मीही दारावर आलो..
तिची प्रीत अंगणाशी..
नभा सांगतो म्हणलो..

उगा बावरणे झाले..
मग सारवणेही झाले..
गाली लाजता लाजता..
उगा रागवणेही आले..

ती हसत म्हणाली..

“सांगतोस….मग
सांग ‘गीत’ प्रेमाचे त्या नाव
भेट प्रीतीची म्हणोनी
रोज देईन चांदण्यांचा गाव

–सचिन काकडे [ सप्टेंबर ११,२००८]
फ़क्त तुझ्यासाठीच ” हा खेळ सावल्यांचा”

© सचिन काकडे

१ प्रतिक्रिया

  1. shrikrishnasamant म्हणाले,

    सप्टेंबर 13, 2008 at 11:44 pm

    अति सुंदर.प्रत्येक कडवे वाचण्यासारखे आहे.निर्मिती ही निसर्गाची देणगी आहे.
    “प्रति(मा)भा उरी धरूनी
    तू काव्य करीत रहावे
    हे भाव स्वप्न अपुरे
    साकार तू करावे”
    keep it up Sachin


टिप्पणी नोंदवा

तुम्हीe logged in to post a comment.