सांगायाचे होते काही…

सांगायाचे होते काही
बोलायाचे होते काही
ओंजळीतच भासांच्या
तोलायाचे होते काही

तिनं धरीला अबोला
ओठी राग ओला ओला
ओल्या तप्त ओठांवरी
लिहायाचे होते काही

आली सांजही अवेळी
तिची अंधाराशी खेळी
त्याच अंधाराच्या पार
पाहायाचे होते काही

दुर सुर तो नभात
उगा काहुर मनात
तिच्या स्वरांच्या मिठीत
शोधायाचे होते काही

सुन्या सुन्याश्या ओळी
डाव संपला आरोळी
गाव सोडताना तिचा
मागायाचे होते काही

–सचिन काकडे [ ऑक्टोंवर १०,२००८]
फ़क्त तुझ्यासाठीच ” हा खेळ सावल्यांचा”

© सचिन काकडे

१ प्रतिक्रिया

  1. वाचून बघा म्हणाले,

    नोव्हेंबर 8, 2008 at 6:02 pm

    “सुन्या सुन्याश्या ओळी
    डाव संपला आरोळी
    गाव सोडताना तिचा
    मागायाचे होते काही” … छान, कविता आवडली !


टिप्पणी नोंदवा

तुम्हीe logged in to post a comment.