उधळले गंध नभाशी, श्वास उराशी, सुर रानांमधोनी….
हा काव्य बहर, ही सुर लहर दिशेदिशेला फिरते….
ही नशा हवेतुनी फिरता-फिरता शब्दांपाशी विरते….
झंकार तिचा तो विरतानाही लाख विजा लाजवतो….
स्वरथेंब नवेसे जमवुनी मेघ मल्हार नभी वाजवतो…
यौवन माजते मनामनाचे, अन लावण्य चोरते अंग….
वेड्या सुरांसवेचा अल्लड वारा धरा छेडण्या दंग…..
वारा अंगणी फिरतो, मातीशी सडा अमृती झरतो….
ओल्या रुपाच्या कवितेचा तव हट्ट मनाशी धरतो….
त्या हट्टात तुटते लाज मनाचा रंग होतो सावळा….
रंगते नवी कहाणी शब्दांची अन नवा काव्य सोहळा….
रंगात सावळ्या भिजुनी पाखरे स्वरास घालीती साद…
नव्या मनाच्या, कोवळ्या तनाच्या कवितेला देती दाद….
–सचिन काकडे [ ऑक्टोंबर १२,२००८]
फ़क्त तुझ्यासाठीच ” हा खेळ सावल्यांचा”
© सचिन काकडे
