______निरोप_______

“आले होते” सांग त्याला..!!
ती उंब-याला सांगुन गेली
पाहिले न मी तिला
ती मला पाहुनी गेली

घर एकांताचे झाले
उंब्-यावर अंगण रुसले
निजभरल्या आभाळाच्या
डोळ्यात हे अंजन कसले?

लहरी मागुनी लहरी
थेंबातुनी फुटली हाक
व्याकुळ सरीत उधळला
वा-याचा ओला धाक

तिन गाव सोडला आता
दारात म्हणाली वीज
-क्षणभर घेउनी श्वास
ये कुशीत माझ्या नीज

मग गहिवरलेली माया
अन गुदमरणारा काळ
त्याच्याही ओठी आला
शब्दांचा नुसता जाळ

ही जन्मभराची आग
उंब-याशी निरांजन जळते
मज त्याची लख्ख कविता
ते विझल्यानंतर कळते

–एस. के.
[मी तुला जपावे क्षणासारखे..तु मज उधळावे मनासारखे]

टिप्पणी नोंदवा

तुम्हीe logged in to post a comment.