गेलं आभाळ सोडुन
खुळं पाखरु मनाचं
भर पावसात आज
जळे घरटं कुणाचं ?
खुळं पाखरु मनाचं
भर पावसात आज
जळे घरटं कुणाचं ?
हा कुणासाठी वारा
तिथे आडोशाला रडे
का हुंदक्यांची धुळ
येई वळचणी पुढे
सरी सांगतात तिला
काय काय विझवावे?
लाज सोडलेली आग,
तिचे पाय भिजवावे
अन मोजुनीया घ्यावं
वय उरल्या क्षणाचं
गेलं आभाळ सोडुन
खुळं पाखरु मनाचं
त्याच्या पिसातले सुर
जरा राखेत माखले
त्यांचं राहिलेले गीत
काळ्या मेघात झाकले
तरी सावळ्या आभाळी
स्वर उमटु लागती
त्या ओळी पुसण्याची
आता सरलीय भिती
आता भय सावल्यांचं
भय नाहीच उन्हाचं
गेलं आभाळ सोडुन
खुळं पाखरु मनाचं
–एस. के. [संपलाय एक स्वप्नातला डाव ...]

हेमंत आठल्ये म्हणाले,
फेब्रुवारी 26, 2010 at 9:12 pm
मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!