_____अबोल______

तु अबोल,मी अबोल,अबोल गीत आपले
तु केसातुन माळलेस, श्वासही फ़ुलातले

अनाम तु,अनाम मी, अनाम हाक येतसे
अशांत पैजणी मनास लागते अटळ पिसे

दुर तुझ्या माझ्याही, हलणा-या सावल्या
ओलकळ्या डोळ्यांशी फ़ुलणा-या ओवल्या

मी तुझ्यात तुटताना हा नभरंग सावळा
तुझ्या उरात तुटलेला सुर शोधतो गळा

तु अलगदही ठेवशील पाण्यावर चांदणे
त्यांनाही चालते का असे अमिट गोंदणे ?

कलंडत्या दिशेवरी, हे मेघ रेखती तुला
कुणी नभास लावला अबोल रंग आपुला ?


–एस. के. [ तु उदास मी उसास, उदास सांज मावळे]

___संभ्रम____

तुझं उगवतानाचं
केशर अंग
जुने तरंग
लयीत कलत्या
तीरावरचा
तो भव्य प्रहर
हलकेच तमांत शिरल्यावर
तुझी हाक ऐकु येते
सजलमेघ वाटांवर
अचल अमित लाटांवर

त्यानं उतरणीला लागलेला
क्षितिजदीप
वितळतो…

प्रतिबिंबीत पर्वत
अंत:करणाच्या पायथ्याशी
संभ्रमी थेंब होतो

तेव्हा अन तिथेच
मी मावळतो
माझ्यातल्या
आंधळ्या सुर्यासकट….!!

–एस. के. [ ती आली ती वेळ ]

तु ये अशी केंव्हातरी

तु ये अशी केंव्हातरी.
ओठावरी गाण्यापरी…!!!
डॊळ्यातल्या पाण्यावरी
तु ये अशी केंव्हातरी…!!!

माझ्याहुनी
माझ्यात खोल…
नजर तु ,
तुझ्यात ओल….
ढळु नकोस
जाईल तोल…
ओघळ असा गालावरी
तु ये अशी केंव्हातरी…!!!!

कोवळ्या फ़ुलावरी
तुझा सुवास…
खुळ्या मनास
तुझाच भास..
तुझाच गंध
श्वास-श्वास….
ही जशी जादुगरी
तु ये अशी केंव्हातरी…!!!!

ओठावरी गाण्यापरी…!!!
डॊळ्यातल्या पाण्यावरी
तु ये अशी केंव्हातरी…!!!

–एस. के [ तुझेच गीत तुझ्यावरी]

____एक गाणं_____

तु हसलीस तेव्हा
त्या ओठांवर
मी नजरेसकट
जन्म…
श्वास…
जीव …
रोखुन

सगळंच गेलं

अगदी क्षणभर
वा-याने गाणंभरुन
फ़ुलांची ओंजळं
अंगावर फ़ेकावी तसचं…
अगदी तसंलच
एक गाणं झालं !!

हसण्याचं…..

मग नसण्याचं !!

नंतर असण्यांच … !!
आणि दिसण्यांच ..

माहित असुनही
मग तुझं उगाचचं
“छे !! तुझं आपलं काहितरीच !”

पुन्हा हसणं
सगळं जाणं
पुन्हा गाणं
एक हसण्याचं
नंतर…..

….
…..

—एस. के. [पुढंच तुला माहितीये .....]

_____शापशब्द______


असे विसरले शब्द मजला, जसे ते मजला आठविले
आभाळाचे कोरे कागद, मी तसेच तयांना पाठविले…!!!

असताल तेथुनी द्या लिहुनच,पाउस मजला यारहो
मी अंगणा सांगुन आलोच, अन ‘ती’लाही, तैयार हो…!!!

वीज लख्ख-थक्क वारा, ओघळ पाणी लिहा तयातच
ओलाव्याचे उदास रडणे नको अताशा नको उगाचच…!!!

ती गेल्याचे वाटत नाही, अन नाही दुखणे कसले काही
ती सुखात गेली हेच मिळाले, अजुन काही उरले नाही…!!!

फ़क्त विखुरल्या रांगोळीची, ऒळ तेवढी सजवुन द्या
त्याआधी पण पावसात ही, माती जरा भिजवुन घ्या…!!!

वाहतील मग रंग सारेच, तो सफ़ेदही पसरेल थोडा
रंग राहुद्या तसेच वाहते, तो एकटाच पाण्याने खोडा…!!!

तुमच्याविना येईल तसाही, या डॊळ्यानाच पाउस माझा
मग ती म्हणेल आरोपाने, हा मी नसल्याचा गाजावाजा…!!!

म्हणुन सांगतो तिला आठवत, उगाच रडवे लिहु नका रे
उश:प ठरावा तिचा शाप हा, या शब्दांनो परत फ़िरा रे…!!!


-एस. के. [ ती गेल्याचा सोहळा ]

Follow

Get every new post delivered to your Inbox.